अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने आता इव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी हार्दिक पटेलने इव्हीएमवर प्रश्नचिन्ह लावले आहे. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला आहे. काँग्रेसने याआधीच इव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
याआधी इव्हीएमशी छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपावर केला होता. तोच धागा पकडून, गुजरातमध्येही भाजपा मोठा इव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचे हार्दिक पटेलने शनिवारी म्हटले होते. 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला होता. भाजपाने इव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला. शनिवारी ट्विटच्या माध्यमातून हार्दिक पटेलने भाजपावर हे आरोप केले. 'शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा इव्हीएम मशिनमध्ये मोठी गडबड करायला चालली आहे. भाजपा गुजरात निवडणूक हारणार आहे. इव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असे हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. गुजरातची निवडणूक हा भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इव्हीएममध्ये फेरफार करून ते ही निवडणूक जिंकतील. पण कुणी शंका उपस्थित करू नये, प्रश्न विचारू नयेत म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये हरतील, असं हार्दिक पटेल याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते.