गांधीनगर - गुजरातमध्ये दोन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. सत्ताधारी भाजपाच्या सुरत जिल्ह्यातील कामरेज येथील आमदार वीडी झालावाडिया आणि बनासकांठा जिल्ह्यातील वावच्या काँग्रेस आमदार गनीबेन ठाकोर यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर, गुजरातचे माजी काँग्रेस अध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री भरतसिंह सोलंकी यांनाही व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
भरतसिंह सोलंकी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. मात्र, श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांची देखभाल घेण्यात येत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. यापूर्वी, गुजरातचे नेते आणि माजीमंत्री शंकरसिंह वाघेला हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. तर, भाजपा आणि काँग्रेसचे पूर्वेतील काही आमदारही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून सध्या ते बरे होऊन घरीही परतले आहेत.
दरम्यान, गुजरातमध्ये आत्तापर्यंत 37 हजारांपेक्षाही अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1970 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये काँग्रसचे वरिष्ठ नेते बदरुद्दीन शेख यांचाही समावेश आहे.