गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण बेपत्ता असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व प्रमुख शहरांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. राज्याच्या शिक्षण विभागाने मंगळवारी राज्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मोरबी जिल्ह्यातील हलवड तालुक्यात पुलावरून जात असताना ट्रॉली ट्रॅक्टर वाहून गेल्याने सात जण बेपत्ता झाले आहेत.
सात जण बेपत्ता
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या शोध मोहिमेला सुमारे २० तास उलटूनही त्यांचा शोध लागला नाही. साबरकांठा जिल्ह्यातील कातवड गावाजवळ पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोन जण प्रवास करत असलेली कार वाहून गेली. स्थानिकांच्या माहितीवरून, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना वाचवलं. मुसळधार पावसात छोटा भारज नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील पुलाचा काही भाग खराब झाला, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
९९ जणांनी गमावला जीव
जिल्हाधिकारी अनिल धमेलिया यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे भारज नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे पोल क्रमांक तीनजवळील पुलाचे नुकसान झाले. वडोदरा, आणंद, खेडा आणि पंचमहाल जिल्ह्यांमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे सखल भागात पाणी साचलं आणि अनेक लोक अडकून पडले. राज्याचे मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी सांगितलं की, गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ९९ वर पोहोचली आहे.