Gujarat Accident : गुजरातच्या अरवलीमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. अरवली जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या बस अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला तर ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन लक्झरी बसची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की तीन जण जागीच ठार झाले. हा सगळा प्रकार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यातील दृश्य हादरवणारी आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं.
गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील मोडासा-मालपूर महामार्गावरुन यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला राज्य परिवहन बसची धडक बसली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले. साकरीया गावाजवळ राज्य महामार्गावर सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला. राज्य परिवहन मंडळाच्या बसने एका बाईकस्वाराला धडक दिली आणि चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्ता दुभाजक ओलांडून महामार्गाच्या दुसच्या बाजूला उभ्या असलेल्या लक्झरी बसला धडकली.
ही भीषण घटना तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अपघातात जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्झरी बस ही पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या यात्रेनंतर वडोदरा येथील सावली येथे प्रवाशांना घेऊन जात होती. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती उपनिरीक्षक अजय सिंह राठोड यांनी दिली. या घटनेत बाईकस्वार, बसमध्ये प्रवास करणारी एक महिला आणि अन्य एका प्रवाशाचा मृत्यू झाला. दोन्ही बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी सुमारे १५ ते २० जणांना उपचारासाठी जवळच्या साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर बाकी जखमींवर मोडासा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.