ऑनलाइन लोकमत -
गांधीनगर, दि. १६ - गुजरातमध्ये धर्मांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे गेल्या 5 वर्षात 1838 अर्ज आले आहेत. ज्यामधील 1735 म्हणजे 94.4 टक्के अर्ज हे हिंदूंनी पाठवले असून धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सर्व धर्मातील लोकांनी हे अर्ज पाठवले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने फक्त 878 अर्ज मंजूर केले असून त्यांना धर्मांतराची परवानगी दिली आहे. गुजरात राज्याच्या धर्मांतराच्या कायद्यानुसार धर्मांतर करण्याआधी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. 1735 अर्ज हिंदूंनी केले असून 57 मुस्लिम, 42 ख्रिश्चन आणि 4 पारशी नागरिकांनी हे अर्ज केले आहेत. शीख आणि बौद्ध धर्मातील एकाही नागरिकाने धर्मांतरासाठी अर्ज केलेला नाही.
तज्ञांच्या मते लग्न हा धर्मांतर करण्याचं एक कारण असू शकत. अनेकदा आपली होणारी पत्नी किंवा पती दुस-या धर्माचे असल्याने धर्मांतर करणं भाग असतं त्यामुळे काहींनी अर्ज केला असण्याची शक्यता आहे. हिंदूंनी पाठवलेले अर्ज हे जास्तकरुन सुरत,राजकोट, पोरबंदर, अहमदाबाद, जामनगर आणि जुनागड या शहरांतून आहेत.
'जर सरकारी आकड्यानुसार फक्त 1735 लोकांनी धर्मांतरासाठी अर्ज केला आहे, याचा अर्थ सरकारने सर्व अर्जांची छाननी केलेली नाही. अधिका-यांनी व्यवस्थित पाहणी केली असती तर हिंदू अर्जदारांचा आकडा 50 हजारापर्यत पोहोचला असता',
असं गुजरात दलित संघटनेचे अध्यक्ष जयंत मनकंदिया यांनी म्हंटलं आहे. तर विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस भारवाड यांनी अशा प्रकारे धर्मांतर करणं देशविरोधी असल्यांचं बोलले आहेत.