गुजरातमधील पाटण जिल्ह्यात गुरुवारी एका ऑटोरिक्षा आणि राज्य परिवहन बसमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सामी-राधनपूर महामार्गावरील सामी गावाजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षाला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
पाटण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व्ही.के. नाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामी- राधनपूर महामार्गावरील सामी गावाजवळ आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राज्य परिवहन बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ऑटोरिक्षाचालकासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे ही टक्कर झाली, अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सर्व मृत राधनपूरच्या वाडी कॉलनीतील असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच राधनपूरचे आमदार आणि भाजप नेते लविंगजी ठाकोर देखील घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी ऑटोमधील सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती दिली.