दाहोद: समोर वाहतूक पोलीस दिसला की त्याला पाहून हेल्मेट डोक्यावर चढवणाऱ्यांची संख्या कमी नाही. अपघात झाल्यास जीव वाचवण्यात हेल्मेट उपयोगी ठरतं. मात्र आपल्या देशात बरेच जण हेल्मेटचा उपयोग दंड चुकवण्यासाठी करतात. हेल्मेट आपल्याच सुरक्षेसाठी परिधान करायचं असतं ही बाब अनेकांच्या अद्याप लक्षात आलेली नाही. हेल्मेटचं महत्त्व अधोरेखित करणारी एक घटना गुजरातच्या दाहोदमध्ये घडली आहे.
गुजरातच्या दाहोदमध्ये झालेल्या एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणं किती महत्त्वाचं आहे ते या व्हिडीओमुळे अधोरेखित झालं आहे. दुचाकीवरून खाली कोसळलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच चाक गेलं. मात्र त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हेल्मेट घातलं असल्यानं दुचाकीस्वाराचे प्राण थोडक्यात वाचले.
नेमका कसा झाला अपघात?एक दुचाकीस्वार महिलेसह जात होता. महिलेच्या हातात एक बाळ होतं. रस्त्यात मोठा खड्डा होता. मात्र पाणी साचलं असल्यानं दुचाकीस्वाराला खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्याचा तोल गेला आणि तो उजव्या दिशेनं पडला. त्याचं डोकं शेजारून उलट दिशेनं निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली आलं. ट्रॉलीचं चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेलं. मात्र हेल्मेट असल्यानं त्याला कोणतीही इजा झाली नाही.