गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यातील जेवणातून एक हजाराहून अधिक जण आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून तपास अहवालानुसार कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. विसगर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी बीएमल मेहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी नेते वजीर खान पठाण यांच्या मुलाचा विवाह सोहळा ३ मार्च रोजी पार पडला. त्यांनी ४ मार्च रोजी रिसेप्शन ठेवलं होतं. या रिसेप्शनला तब्बल १२ ते १४ जणार जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यातील १ हजार ५७ जण आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आजारी पडलेल्यांना गांधीनगरच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पार्थजयसिंह गोहिल म्हणाले की, रुग्णालय प्रशासन यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. रिसेप्शनमध्ये देण्यात आलेल्या मिठाई आणि जेवणातील काही पदार्थांचे सॅम्पल एफएसएल व एफडीसीएच्या पथकानं जमा केले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची आरोग्य विभागाकडूनही चौकशी करण्यात येत आहे. आजारी पडलेल्यांच्या उलटी आणि शौचाचे सॅम्पल जमा करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी रिसेप्शन सोहळ्यातील कॅटररच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. पण त्यासोबतच जेवणातील भेसळीचंही हे प्रकरण असू शकतं अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.