गुजरातचा आणंद जिल्हा चर्चेत आला आहे. या जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून गोळ्याच्या आकाराच्या वस्तू पडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातही अशाचप्रकारे जळती रिंग पडली होती.
सोशल मीडियावर यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अनेकांनी हा एलियनचा गोळा म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने हे गोळे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आणंद जिल्ह्यातील भालेज, खांभोळज आणि रामपुरा परिसरात गुरुवारी सायंकाळी गोळ्यासारख्या दिसणार्या अज्ञात वस्तू आकाशातून पडल्या. हे तिन्ही भाग एकमेकांपासून 15 किलोमीटर अंतरावर आहेत. सुरुवातीला भालेजमध्ये हा काळ्या रंगाचा गोळा पडला. त्यानंतर काही वेळाने अन्य दोन ठिकाणी हे गोळे पडले.
आनंद जिल्ह्याचे एसपी अजित रझियान यांनी सांगितले की, धातूचे हे गोळे एखाद्या उपग्रहाचे अवशेष असू शकतात. पहिला गोळा दुपारी 4.45 च्या सुमारास पडला. यानंतर काही वेळाने अन्य दोन ठिकाणांवरून सूचना प्राप्त झाली.
गेल्या महिन्यातही रात्रीच्या अंधारात गुजरातमध्ये आकाशात आगीच्या गोळ्यासारखी दिसणारी वस्तू खूप वेगाने पृथ्वीकडे येताना दिसली. त्यामुळे लोक घाबरले होते. 2 एप्रिल 2022 रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूरमध्ये देखील अशीच वस्तू पडत होती. याचा व्हिडीओ काढण्य़ात आला होता. नंतर हा मलबा एखाद्या रॉकेटचा असल्याचे सांगण्यात आले होते.