अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीतील महापालिका निवडणुकीत मोठ्या विजय मिळविल्यानंतर, आता दुसऱ्याच दिवशी आणखी एक विक्रम केला आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याच बरोबर देशातील राष्ट्रीय पक्षांचा आकडा वाढून आता 9 वर पोहोचेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने आतापर्यंत जवळपास 13 टक्के मते मिळविली आहेत. याच बरोबर आता आप गुजरातमध्ये एक प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षही बनला आहे. मात्र, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून याची अधिकृत घोषणा केली जाईल.
देशात एकूण किती राष्ट्रीय पक्ष -निवडणूक आयोगानुसार देशात, काँग्रेस, भाजप, बीएसपी, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय, सीपीआयएम आणि एनपीपी हे आधीपासूनच राष्ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आधीच राज्य स्थरीय अथवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपला गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत 6.8 टक्के मते मिळाली आहेत.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी महत्वाच्या अटी - कुठल्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागत असतात. 1. जर एखाद्या पक्षाने चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळवला तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.2. जर एखाद्या पक्षाने तीन राज्य मिळून लोकसभेत तीन टक्के जागा मिळवल्या तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.3. जर एखाद्या पक्षाने चार लोकसभा जागांशिवाय संसदीय अथवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळविली तर, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.4. जर एखाद्या पक्षाने वरील पैकी कुठल्याही तीन अटींपैकी एक अट पूर्ण केल्यास, त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.