अहमदाबाद: गुजरातमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी २६ मार्चला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलंय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री नितीन पटेल राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसनं पटेल यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय. विशेष म्हणजे काँग्रेसनं पटेल यांना विधानसभेत मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे गुजरातमधलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राप्रमाणाचे सध्या गुजरातमध्येही विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अमरेली जिल्ह्यातल्या लाठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विरजी ठुमरने यांनी अचानक उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव घेतलं. वीस आमदारांसह भाजपा सोडा आणि काँग्रेसमध्ये या, अशी थेट ऑफरच विरजींनी दिली. 'तुम्ही २० आमदारांसह काँग्रेसमध्ये या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू,' असं विरजी विधानसभेत म्हणाले. यानंतर विधानसभेत गोंधळ झाला. काँग्रेसनं थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानं भाजपा काहीशी बॅकफूटवर गेली. त्यांनी लगेचच पटेल यांचा बचाव सुरू केला. काँग्रेस पटेल यांना लक्ष्य करत असल्याचं भाजपानं म्हटलं. राजकीय रणनीतीकारांच्या अंदाजानुसार, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं वेगळी व्यूहनीती आखली आहे. गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या गेल्या काही निवडणुकांआधी काँग्रेसच्या आमदारांनी कमळ हाती घेतल्यानं भाजपाला फायदा झाल्याचं पाहायला मिळालंय. यामुळेच यंदा काँग्रेसनं आधीच भाजपाला लक्ष्य करत स्वत:च्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी करत ८१ जागा जिंकल्या. काँग्रेसच्या जागांमध्ये २० जागांची वाढ होत असताना भाजपाच्या आमदारांची संख्या मात्र ११५ वरुन ९९ वर आली. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसला एक अधिकची जागा मिळेल.
वीस आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची उपमुख्यमंत्र्यांना विधानसभेत ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 8:30 AM