अहमदाबाद - काँग्रेसनं गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (27 नोव्हेंबर) आपल्याा 76 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गोवाभाई एच राबारी, डॉक्टर किरीट पटेल, रमेश भाई चावडा, जीवाभाई पटेल, गोविंद ठाकोर, सुरेशभाई सी पटेल, बलदेव जी सी ठाकोर, प्रकाश डी. तिवारी, श्वेता ब्रह्मभट्ट आणि राजेंद्र पटेल यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात दुस-या टप्प्यात होणा-या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची 28 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.
दरम्यान, काँग्रेसनं उमेदवारांची ही यादी जाहीर केल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरुन प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी गांधीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात तोडफोड करत आपला राग व्यक्त केला.
कधी आहे मतदान?
9 डिंसेबर आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकांसाठी काँग्रेसनं चांगलीच कंबर कसलीय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील गुजरातमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे.
मागील दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. मोदींच्या काळात भाजपाने इथे आपली पाळंमुळं अधिक घट्टपणे रोवली. पण मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय उलथापालथी घडल्या.
आनंदीबेन पटेल यांना तिकीट नाहीदरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानंही आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच भाजपानं गुजरात विधानसभेसाठीच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या नावाचा समावेश नाहीय, त्यांच्याऐवजी भूपेंद्र पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. कारण, आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक लढवण्यास पूर्वीच नकार दिला होता. भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे सुरू झालेले प्रकरण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत सुरू आहे.