नवी दिल्ली : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही भाजपने आपली निवडणूक रणनीती आतापासूनच सुरू केली आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेत्यांचा गुजरात दौरा निश्चित केला आहे. 6 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री गुजरातच्या विविध भागात सभा घेणार असून येथील भाजप नेत्यांसह लोकांशी संवाद साधणार आहेत.
आज म्हणजेच 6 ऑक्टोबरला परराष्ट्र आणि सांस्कृतिक मंत्री मीनाक्षी लेखी आणि बीएल वर्मा गुजरात दौऱ्यावर आहेत. मीनाक्षी लेखी या व्यारा आणि निजार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. तर बीएल वर्मा अहमदाबाद आणि महुधाचा दौरा करणार आहेत. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, अजय भट्ट, भूपेंद्र यादव आणि किरेन रिजुजू सुद्धा गुजरातच्या दौऱ्यावर असणार आहेत.
वीरेंद्र कुमार कलोल विधानसभा मतदारसंघाला भेट देतील, तर स्मृती इरणी आणंद जिल्ह्यातील पेटलाद आणि सोजित्रा मतदारसंघाचा दौरा करतील. साध्वी निरंजन ज्योती अहमदाबाद जिल्ह्यातील विरमगाम आणि धोलका, तर अजय भट्ट अरवली जिल्ह्यातील मोडासा विधानसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव अमरेलीतील सावरकुंडला आणि राजुला, तर किरेन रिजुजू भावनगरमधील महुआ याठिकाणी भेट देणार आहेत.
याशिवाय, 8 ऑक्टोबरला डॉ. वीरेंद्र कुमार पंचमहालच्या हलोल विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री अजय भट्ट अरवल्ली जिल्ह्यातील बाढ़ विधानसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत आणि किरेन रिजुजू भावनगरच्या पालिताना विधानसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतील. तर 9 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री प्रतिभा भौमिक बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.
दुसरीकडे, भानु प्रताप सिंह वर्मा बोताद जिल्ह्यातील गढ़डा आणि बोटादचा दौरा करणार आहेत. 10 ऑक्टोबर रोजी अर्जुन मुंडा दाहोदमधील जालोद आणि दाहोद विधानसभा मतदारसंघांना भेट देणार असून भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. याशिवाय, प्रतिभा भौमिक पाटण जिल्ह्यातील शिवपूर विधानसभा मतदार संघाला भेट देणार आहेत. गिरिराज सिंह गीर सोमनाथच्या उना आणि सोमनाथ विधानसभा मतदार संघाला भेट देऊन तयारीचा आढावा घेणार आहेत.