Gujarat Assembly Election 2022: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्यातील 182 मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी होईल. तसेच, अंतिम निकाल 8 डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी जाहीर होणार आहे.
भाजपची बैठक सुरूगुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. यासाठी आता भाजप कोअर कमिटी आणि राज्य निवडणूक समितीच्या नेत्यांची राज्यातील पक्षाच्या मुख्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा आणि छाननी करण्यात येत आहे.
लवकरच उमेदवारांची नावे निश्चित होणारपक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 182 जागांसाठी 4000 हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. आजच्या महत्त्वाच्या बैठकीत गुजरातमधील 13 जिल्ह्यांतील 47 विधानसभा जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, उर्वरित 135 जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर उद्या आणि परवा बैठकीत चर्चा होईल. भाजप केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाकडे जाण्यापूर्वी भाजपच्या सर्व 182 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय येत्या 3-4 दिवसांत केली जाईल.
25 आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतातदरम्यान, गृहमंत्र्यांनी गुजरातमधील त्यांच्या शेवटच्या 6 दिवसांच्या मुक्कामात स्थानिक नेत्यांची प्रमुख निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आणि 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी सर्व विधानसभांना उमेदवारांच्या नावांवर अभिप्राय घेण्यास सांगितले. ज्या नेत्यांचा प्रतिसाद नकारात्मक असेल, त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते, असे मानले जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये यावेळी भाजप विद्यमान आमदारांपैकी सुमारे 25 टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. म्हणजेच एकूण 99 भाजप आमदारांपैकी सुमारे 23-25 आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात.