गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी अहमदाबादच्या राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. यापूर्वी ते राजभवनातून मतदान केंद्राकडे निघाले. मतदान केंद्राकडे जात असताना मोदींनी शाळेच्या वाटेवर उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन केले. महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्रावर मोदी रांगेत उभे राहिले आणि त्यांनी आपला क्रमांक आल्यानतंर, मतदान केले.
मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील जनतेने लोकशाहीचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला. मी देशातील जनतेचे आभार मानतो. निवडणूक प्रक्रिया शांततेत पारपडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदी आज त्यांचे बंधू सोमाभाई यांना भेटायलाही जाणार आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी ८ वाजता सुरू झाले, जे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. ट्विटमध्ये पीएम मोदी यांनी म्हटले आहे, "मी गुजरातमधील जनतेला, विशेषत: महिला आणि तरुणांना दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याची विनंती करतो. मी सकाळी ९ वाजता मतदान करणार आहे."
याच बरोबर, गृह मंत्री अमित शाहदेखील आज अहमदाबादमध्ये मतदान करतील. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 विधानसभा जागांसाठी मतदान झाले आहे. निवडणूक निकालाची घोषणा 8 डिसेंबरला होणार आहे.