गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. जवळपास निम्मा गुजरात आज मतदानाचा हक्क बजावणार आहे. दक्षिण गुजरातमधील १९ जिल्हे व कच्छ-सौराष्ट्रमधील ८९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. गुजरातमधील निवडणूक एकतर्फी होईल असे अंदाज असताना सकाळी सुस्त मतदानाला सुरुवात झाल्याने वेगवेगळ्या शंका घेण्यात येत होत्या. परंतू, ११ वाजेपर्यंत अचानक मतदानाचा वेग वाढल्याने पक्षांमध्ये धाकधुक वाढली आहे.
गुजरातमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ४ टक्के मतदान झाले होते. यामुळे विरोधी पक्षांनी मुद्दामहून मतदानाचा वेग कमी केल्याचा आरोप केला आहे. आपचे गुजरात अध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी हा आरोप केला आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या गुंडांच्या दबावाखाली काम करत असून मग निवडणूकचा का घेता असा सवाल केला आहे. गुजरातमध्ये ३.५ टक्के मतदान झालेले असताना कतारगाममध्ये हा आकडा 1.41% एवढाच आहे. एका छोट्या मुलाला हरविण्यासाठी एवढीही खालची पातळी गाठू नका, असा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळी ४ टक्के मतदान झाल्याने गुजरातमध्ये मतदारांत उत्साह दिसत नसल्याचे अंदाज लावले जात होते. परंतू, सकाळी ११ वाजताच्या आकड्याने सर्व पक्षांच्या मनात लाडू फोडले आहेत. वाढलेला वेग कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले. म्हणजेच पुढच्या दोन तासांत १५ टक्के मतदान वाढले आहे. हा वेग असाच राहिला तर गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान साठ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
2017 मध्ये गुजरातमध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. यापैकी भाजपाला ४९ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. यंदा आप रणांगणात उतरल्याने दोन्ही पक्षांची काही लाख मते ही आपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यामुळे देखील निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी आपला २४ हजार मते मिळाली होती. परंतू यावेळी आप पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. दुसरा टप्पा ५ डिसेंबरला पार पडणार असून निकाल ८ डिसेंबरला लागेल.