गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातच्या सौराष्ट्रमध्ये विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चार जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. आज सकाळी नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिरात पूजा केली. त्यानंतर आता गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ शहरात सभेला संबोधित करणार आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, वेरावळनंतर नरेंद्र मोदी सत्ताधारी भाजपच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून दुसर्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी राजकोट जिल्ह्यातील धोराजीला रवाना होतील. यानंतर नरेंद्र मोदी यांचा अमरेली आणि बोटाडमध्ये सभांना संबोधित करण्याचा कार्यक्रम आहे.
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एका सभेला संबोधित केले. या जाहीर सभेत त्यांनी गुजराती अभिमान जपण्याचे आवाहन करत गुजरातची बदनामी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. अशा लोकांना राज्यात स्थान मिळू नये, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. विशेष म्हणजे यावेळच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निवडणूक प्रचार सभांमध्ये गुजरातच्या अभिमानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गुजरातच्या मॉडेलला बदनाम करणार्यांची टोळी सक्रीय झाली आहे, असे अनेक प्रसंगी नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र, यासाठी त्यांनी आतापर्यंत थेट कोणत्याही पक्षाचे नाव घेण्याचे टाळले आहे.
गेल्या दोन दशकात जनतेच्या सहकार्याने नवा गुजरात बनवल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, गुजरातची जनता आता त्यांची मेहनत वाया घालवणार नाही. भाजपला पुन्हा एकदा विजयी करा. जेणेकरून दुहेरी इंजिन असलेले सरकार गुजरातचा विकास सातत्याने पुढे नेऊ शकेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदानगुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.