- महेश खरे
सूरत : गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या या टप्प्यात काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून, भाजपाला त्याचीच चिंता दिसत आहे.पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भाजपासाठी उतरणार असल्याने बड्या नेत्यांचे सामने राज्यात पाहायला मिळतील. सध्या काँग्रेस आणि भाजपा एकमेकांना गुजरातविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांचा दौरा महात्मा गांधी की जन्मस्थळ असलेल्या पोरबंदरहून सुरू झाला, तर २७ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी डिजिटल सभांमधून ‘मन की बात’ व ‘चाय पर चर्चा’ याद्वारे मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधी यांनी दोन दिवसांच्या दौ-यात मच्छीमारांचे प्रश्न, त्यांना मिळणाºया डिझेलवरील उठवण्यात आलेली सबसिडी, शेतक-यांच्या समस्या, बेरोजगारीचा प्रश्न आणि टाटांच्या नॅनो प्रकल्पाला देण्यात आलेले ३३ हजार कोटी यावरून भाजपावर हल्ला चढवला. काळा पैसा नष्ट करण्याच्या नावाखाली देशातील गरिबांना बँकांच्या रांगेत उभे करणाºया मोदी सरकारने १0-१२ उद्योगपतींचे भले केल्याचा आरोप त्यांनी केला आणि गुजरातमध्ये उच्च शिक्षण व आरोग्य सेवा महाग करायला भाजपा सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सर्व मुद्दे उपस्थित करून भाजपा गुजरातविरोधी असल्याचे ते सर्व सभांतून मतदारांच्या मनात बिंबवत होते.