Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये काँग्रेसला 5 पेक्षा कमी जागा मिळणार; अरविंद केजरीवालांनी कागदावर लिहून दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 03:27 PM2022-11-06T15:27:04+5:302022-11-06T15:27:47+5:30
Gujarat Assembly Election: पंजाब निवडणुकीपूर्वीही केजरीवालांनी कागदावर लिहून सांगितलं होतं की, चरनजीत सिंग चन्नी पडणार. झालेही तसेच...
Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी संपूर्ण ताकतीने प्रचार करत आहेत. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही एक दावा केला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार, हे त्यांनी लेखी सांगितले आहे.
पंजाबमध्येही असेच भाकित
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात अरविंज केजरीवाल यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन्ही जागांवरून पराभूत होणार असल्याचे भाकित व्यक्त केल होते. पंजाबच्या निकालातही चन्नी यांनी दोन्ही जागा गमावल्या. गुजरात निवडणुकीबाबतही केजरीवाल यांनी असेच भाकित व्यक्त केले आहे.
काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा
'आज तक'च्या कार्यक्रमात त्यांनी एका कागदावर हिलून दिले की, काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा मिळणार आहेत. काँग्रेसला कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी मारला. ते पुढे म्हणाले की, गुजरात जनतेला बदल हवा आहे. लोकांना बदल नको असता, तर आम्हाला इतका पाठिंबा मिळाला नसता. आम्हाला 30 टक्के मतदान मिळणार आहे. पंजाबमध्ये सरकार बनवले, गुजरातमध्येही तसेच होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसचा 'आप'वर आरोप
काँग्रेसने आम आदमी पक्षावर (आप) गुजरातमध्ये प्रचंड पैसा खर्च केल्याचा आरोप केला आणि दावा केला की भारतीय जनता पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे उमेदवार ठरवत आहे. पक्षाचे प्रसारमाध्यम आणि प्रचार प्रमुख पवन खेरा यांनी एक दिवस अगोदर 'आप' सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या इंद्रनील राजगुरू यांच्या दाव्याचा संदर्भ देताना हा आरोप केला. .