गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या परिक्षेत पंतप्रधान कोण पास होते, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत.
18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पंतप्रधानपदापर्यंत प्रवास केलेले नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणारे राहुल गांधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गड राहुल गांधी सर करणार का ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राहुल गांधी आता अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणं फारच महत्वाचं आहे. आपल्याला सिद्ध करण्याची ही अजून एक संधी त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा सत्तेवर येणं तितकंच महत्वाचं आहे. तसं न झाल्यास मोदींच्या तुलनेत राहुल गांधींचं राजकीय वजन वाढेल यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष ही निवडणूक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत.
आज पहिल्या टप्प्यातील मतदानगुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 182 जागांपैकी 89 जागांसाठी मतदान पार पडेल. या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात क्षेत्रात निवडणूक होईल. मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह 977 उम्मेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सौराष्ट्रमध्ये एकुण 11 जिल्हे येतात. त्यामध्ये कच्छ हा सगळ्यात मोठा जिल्हा असून त्या 10 तालुके, 939 गावं आणि सहा नगरपालिकांचा समावेश आहे.
टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला बहुमत, १११ जागा मिळण्याचा अंदाज इतर सर्व्हेंप्रमाणेच टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरने घेतलेल्या या सर्व्हेमध्येही भाजपाच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेमध्ये गुजरातमध्ये भाजपाला ४५ टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मते मिळतील असे भाकीत करण्यात आले आहे. तर इतर पक्षांच्या झोळीत १५ टक्के मते जातील.
मिळणाऱ्या मतांचे जागांमध्ये रूपांतर केल्यास भाजपाला १११, काँग्रेसला ६८ तर इतरांना तीन जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हटले आहे. गुजरातमधील विविध भागात जीएसटी तसेच पाटिदारांचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न यामुळे भाजपाच्या मतांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र भाजपाला गाठणे काँग्रेसला शक्य होणार नसल्याचे सर्व्हेत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.