Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. एवढे मोठे यश १९५५ पासून सत्तेत असलेल्या भाजपाला पहिल्यांदाच मिळाले आहे. गेल्या वेळी भाजपाला ९९ आणि काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. यामुळे यावेळी काँग्रेसला टक्कर देण्याची आशा होती. परंतु 'आप'ला मतदान मोठ्याप्रमाणावर झाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले गेल्याचे दिसत आहेत. दरम्यान, निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि आम आदमी पक्षाला टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आप आणि भाजपवर निशाणा साधला. "आप"हमे दिल्ली दो हम "आप" को पुरा गुजरात देंगे, असं ट्वीट मिटकरी यांनी केलं आहे.
फडणवीसांनीही साधला आपवर निशाणा"आप दिल्लीपुरताच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचल्याचंही म्हटलं आहे. "आम आदमी पक्ष दिल्लीपुरता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुजरातचा विकास फक्त भाजपाच करू शकतो हेदेखील सिद्ध झालं आहे. प्रचारासाठी गेलो होतो तेव्हाच गुजरातचा मूड दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.