अहमदाबाद - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून गुजरातच्या सत्तेवर असलेला भाजपा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहराज्यातील सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाला धक्का देण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. तसेच अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानेही निवडणुकीत उडी घेत या दोन्ही पक्षांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. या निवडणुकीदरम्यान, सत्ताधारी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होत असल्याने, पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच निवडणूक काही दिवसांवर आली असताना भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
गुजरात भाजपामधील बडे नेते आणि चारवेळचे आमदार जय नारायण व्यास यांनी पक्ष सोडल्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र समीर व्यास हेही काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत जय नारायण व्यास यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खर्गे यांनी त्यांना पक्षसदस्यत्व दिले. यावेळी काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गहलोत आणि केंद्रीय निरीक्षण आलोक शर्मा हेही उपस्थित होते.
गुजरात विधानसभेची निवडणूक दो टप्प्यांमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. गुजरात विधानसभेमध्ये एकूण १८२ जागा असून, २०१७ च्या निवडणुकीत येथे काँग्रेसने भाजपाला जोरदात टक्क दिली होती. तेव्हा भाजपाला ९९ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ७५ हून अधिक धावा जिंकल्या होत्या.