गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल बदलणार? काही मतदार संघातील पुनर्मतमोजणीसाठी हायकोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 10:55 PM2018-02-08T22:55:55+5:302018-02-08T22:58:05+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अखेर या निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखण्यात भाजपाने यश मिळवले होते.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अखेर या निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखण्यात भाजपाने यश मिळवले होते. मात्र निवडणुकीचे निकाल लागून आता दोन महिन्यांचा अवधी उलटल्यानंतर निकालांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गुजरातमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी 20 याचिका दाखल करून गुजरात विधानसभा निवडणुकीत 5 हजारांहून कमी मतांनी निकाल लागलेल्या मतदारसंघांमधील निकालांना आव्हान दिले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या 20 मतदार संघांपैकी 16 मतदार संघांमधील जयपराजयाचे अंतर हे 3 हजारांहून कमी होते.
तसेच उच्च न्यायालयात ज्या विधानसभा मतदारसंघातील निकालांना आव्हान देण्यात आले आहे, त्यामध्ये अहमदाबादमधील कॅबिनेट मंत्री भूपेंद्र सिंह यांचा धोलका मतदारसंघ, बाबूभाई बोखेरिया यांचा पोरबंदर मतदारसंघ, सी. के राऊजी यांच्या गोध्रा मतदार संघांचा समावेश आहे. त्याखेरीज दानी लिमडा मतदारसंघातून काँग्रेसच्या शैलेश यांनी मिळवलेल्या विजयालाही आव्हान देण्यात आले आहे.
गुजरातच्या उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या वकिलांमार्फत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा मुख्य याचिकाकर्ते आहेत. त्यांनी न्यायालयामध्ये 5 हजारांहून कमी मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने एकूण 99 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने 80 जागा जिंकल्या. इतर उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले.