अहमदाबाद: या वर्षाच्या अखेरीस हिमाचल आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. एकीकके गुजरात काबीज करण्यासाठी AAPचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील भाजपचा जोरदार प्रचार करत आहेत. मंगळवारी शहांनी आपवर जोरदार हल्लाबोल केला.
एका कार्यक्रमाला डिजिटली संबोधित करताना शहांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल. स्वप्ने विकणाऱ्यांना(आप) गुजरात निवडणुकीत कधीच यश मिळणार नाही. मी गुजरातच्या लोकांना ओळखतो, काम करणाऱ्यांवर गुजराती जनता विश्वास ठेवते. त्यामुळे भाजपचा गुजरातमध्ये दणदणीत विजय होईल.
शहा पुढे म्हणाले, 'मला स्पष्टपणे दिसत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र पटेलांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा आगामी निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल. आपचे राष्ट्रीय संयोजक म्हणतात की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर राज्यातील भ्रष्टाचार मिटवला जाईल. पण, यांच्याच पक्षातील अनेकजण भ्रष्टाचारी आहेत. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की, त्यांनी या लोकांच्या नादी लागू नये,' असा हल्लाबोल शहांनी केला.
केजरीवालांची भाजपवर टीकाअहमदाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना केजरीवालांनी गुजरातमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, 'मी गुजरातमध्ये ज्यांना भेटलो त्यांनी सांगितले की सर्वत्र भ्रष्टाचार आहे. सरकारी काम करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते. खालच्या पातळीवर भ्रष्टाचार आणि वरच्या पातळीवर घोटाळे आहेत. याविरोधात कोणी बोलले तर त्याला धमकावले जाते. गुजरातमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार आणि गुंडगिरी आहे. आपचे सरकार आल्यावर गुजरात भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त होईल.'