Gujarat Elections 2022: किती आले, किती गेले... पण PM Modi सर्वांना पुरून उरले! त्यांचा 'हा' विक्रम मोडणे सध्या तरी अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 06:15 PM2022-11-03T18:15:17+5:302022-11-03T18:17:20+5:30
गुजरातमध्ये १९९५ च्या आधी भाजपाला फारसं महत्त्व नव्हतं, पण...
Gujarat Assembly Elections 2022 Dates Announced, PM Modi: गुजरात विधानसभा निवडणूक 2022च्या तारखा जाहीर झाल्या. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'होम ग्राऊंड' आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. १ मे १९६० रोजी गुजरात आणि महाराष्ट्राची विभागणी भाषेच्या आधारावर झाली. बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट, १९६० अंतर्गत निर्माण झालेला गुजरात आता ६२ वर्षांचा झाला. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकूण १७ नेते विराजमान झाले आहेत. गेल्या अडीच दशकांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता असताना १९९५ हे शेवटचे वर्ष होते. पण गुजरात राज्याची स्थापना झाल्यापासून नरेंद्र मोदींच्या नावावर एक असा विक्रम आहे जो नजीकच्या काळात तरी मोडणं शक्य नाही.
गुजरात हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ९०च्या दशकात गुजरात हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला ठरला. पण त्याआधी गुजरातच्या स्थापनेनंतर तेथे १३ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. गुजरातचे पहिले मुख्यमंत्री डॉ. जीवराज नारायण मेहता हे काँग्रेसचे नेते होते. इंदिरा गांधींच्या आणीबाणीनंतर गुजरातमधील राजकीय परिस्थिती बदलू लागली. त्यानंतर मग भाजपाने गुजरातमध्ये जम बसवला. नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ गुजरातचे (2001-2014) मुख्यमंत्री होते. सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून हा विक्रम नजीकच्या काळात मोडण्याची अजिबातच शक्यता नाही.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत बाबूभाई जशभाई पटेल (१८ जून १९७५ - १२ मार्च १९७६) मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांचे सरकार चार महिन्यांत पडले आणि काँग्रेसचे माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री झाले. सोलंकी यांचे सरकार पडल्यानंतर बाबूभाई जशभाई पटेल (११ एप्रिल 1977 - 17 फेब्रुवारी 1980) यांना आणखी तीन वर्षांसाठी पुन्हा संधी मिळाली. यावेळी त्यांना जनता पक्षाने मुख्यमंत्री केले. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाल्यानंतर १९८० ते १९९० पर्यंत काँग्रेसने सातत्याने राज्य केले.
गुजरातमध्ये १९९५ मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्याची पहिली संधी मिळाली. केशुभाई पटेल हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपाला गुजरातमध्ये बाहेरचा पक्ष मानले जात असल्याने त्यांना सुरूवातीला कोणी कार्यालय भाड्याने द्यायलाही तयार नव्हते, पण अखेर त्यांनी हळूहळू गुजरातमध्ये जम बसवला, तो अजूनही कायम आहे.