Gujarat Assembly Elections 2022 : सात अब्जाधीश उमेदवारांपैकी पाच भाजपचे, बहुतेकांनी दहावीनंतर शिक्षण घेतलेले नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:41 PM2022-11-22T15:41:32+5:302022-11-22T15:42:18+5:30

Gujarat Assembly Elections 2022 : गांधीनगरच्या मनसा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे 64 वर्षीय उमेदवार जयंती पटेल या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

Gujarat Assembly Elections 2022 Five Of Seven Billionaire Candidates From Bjp | Gujarat Assembly Elections 2022 : सात अब्जाधीश उमेदवारांपैकी पाच भाजपचे, बहुतेकांनी दहावीनंतर शिक्षण घेतलेले नाही 

Gujarat Assembly Elections 2022 : सात अब्जाधीश उमेदवारांपैकी पाच भाजपचे, बहुतेकांनी दहावीनंतर शिक्षण घेतलेले नाही 

googlenewsNext

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासोबतच उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर येत आहेत. या निवडणुकीत सात अब्जाधीश रिंगणात असून, त्यापैकी पाच भाजपचे आणि दोन काँग्रेसचे आहेत. दरम्यान, 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 100 कोटींहून अधिक संपत्ती असलेले दोनच उमेदवार होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या सात उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

गांधीनगरच्या मनसा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे 64 वर्षीय उमेदवार जयंती पटेल या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जयंती पटेल यांनी आपली संपत्ती 661.28 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये जयंती पटेल आणि त्यांच्या पत्नी आनंदीबेन जयंतीभाई पटेल यांच्या मालमत्तेचा समावेश आहे.

कडवा पाटीदार समाजातील जयंती पटेल हे दहावी उत्तीर्ण असलेले एक व्यवसायिक आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, जयंती पटेल यांच्याकडे 147 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 514 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. जयंती पटेल यांच्यावर 233 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या मतदारसंघातील काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने मनसा विधानसभा मतदारसंघात 500 मतांनी विजय मिळवला होता.

भाजपकडून पाटण जिल्ह्यातील सिद्धपूरमधून निवडणूक लढवत असलेले 61 वर्षीय बलवंतसिंह राजपूत यांनी आपली एकूण संपत्ती 367.89 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, राजपूत यांची जंगम मालमत्ता 266 कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता 101 कोटी रुपये आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसचे चंदनजी ठाकोर यांनी 17,000 मतांनी जिंकली होती. तसेच, 140 कोटींची मालमत्ता असलेले बिल्डर रघुनाथ देसाई यांना काँग्रेसने पाटनमधील राधनपूर या दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. देसाई यांनी 3.25 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे.

राजकोट दक्षिणमधून भाजपचे रमेशभाई तिलारा यांना तिकीट देण्यात आले आहे. रमेशभाई तिलारा हे एक व्यावसायिक आहे. त्यांनी आपली एकूण 172 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये 156.42 कोटी रुपयांच्या स्थावर आणि 16.35 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे. राजकोट पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर इंद्रनील राजगुरू रिंगणात आहेत. 56 वर्षीय इंद्रनील यांनी आपली एकूण संपत्ती 160 कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे. इंद्रनील यांच्याकडे बीएमडब्ल्यू कार आणि बीएमडब्ल्यू बाईक, एक ऑडी कार, एक जेनेरिक जीप, एक ट्रॅक्टर, लँड रोव्हर आणि फोक्सवॅगन बीटल आहे.

पाच वर्षांत 30 टक्क्यांनी वाढली संपत्तीची किंमत
भाजपचे द्वारकेचे उमेदवार पबुभा मानेक यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची किंमत 115 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. पबुभा माणेक यांनी मागील निवडणुकीत 5 हजार मतांनी विजय मिळवला होता. पाच वर्षांपूर्वी पबुभा मानेक यांची एकूण संपत्ती 88.42 कोटी रुपये होती, जी आता 30 टक्क्यांनी वाढली आहे. जुनागढमधील मनवादर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जवाहर चावडा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती 130 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Gujarat Assembly Elections 2022 Five Of Seven Billionaire Candidates From Bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.