गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, जिथे भाजपा पुन्हा एकदा गुजरातमध्ये प्रचंड बहुमताने आपले सरकार बनवताना दिसत आहे. एकीकडे देशभरातील भाजपा कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे नेते सातत्याने भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी भाजपावर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला निधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सिद्धरमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
गुजरातमधील निकालानंतर सिद्धरमय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपाने गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (आप) निधी दिला आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. "आपने गुजरातमध्ये खूप खर्च केला. माझी माहिती सांगते की, भाजपाने काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला पैसे दिले, कारण आपने निवडणुका लढल्या, आम्ही मागे राहिलो."
"नवीन पक्षाला 10 टक्के मते मिळाली, त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये घट झाली. आपने निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च केला. त्यांनी काँग्रेसपेक्षा जास्त खर्च केला. तरीही ते सहा जागांवर आघाडीवर आहेत" असं देखील सिद्धरमय्या यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरातमधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. पोकळ आश्वासने आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे असं म्हणत आप आणि काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. तसेच त्यांनी विकासाचे राजकारण करणाऱ्या मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला असं म्हणत विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभारही मानले आहेत.
"पोकळ आश्वासने देणाऱ्यांना जनतेने नाकारले अन्..."; ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांची प्रतिक्रिया
अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा 184 पैकी 158 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. अमित शाह यांनी "गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.