Gujarat Elections 2022, Rivaba Jadeja: रवींद्र जाडेजाच्या घरातच 'नणंद vs भावजय' सामना; बहिण करतेय पत्नीच्या विरोधात प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:29 PM2022-11-14T14:29:49+5:302022-11-14T14:30:33+5:30
गुजरातच्या जामनगरमधून जाडेजाची पत्नी रिवाबाला भाजपाकडून तिकीट
Gujarat Elections 2022, Rivaba Ravindra Jadeja: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला जामनगर उत्तरमधून तिकीट दिले. रिवाबाला निवडणूक लढवण्याचा कोणताही अनुभव नसतानाही हा आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आला. या जागेवरून सत्ताधारी पक्षाने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जाडेजा यांना तिकीट नाकारून त्याजागी रिवाबाला तिकीट मिळाले. रवींद्र जाडेजाने, आपल्या पत्नीला निवडणुकीत विजयी करण्याचे एका व्हिडीओद्वारे केले. मात्र रवींद्र जाडेजाची बहीण नयना जाडेजा हिने रिवाबाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने प्रचार करायला सुरूवात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून या सर्व जागांसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बिपेंद्रसिंग जाडेजा यांच्यासाठी रविंद्र जाडेजाची बहिण मते मागताना दिसत आहे. भाजपवर आरोप करताना नयना म्हणाली, "महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दोन दिवसांपासून पायी चालत होतो. सर्वसामान्यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. काँग्रेसची सत्ता यावी अशी जनतेची इच्छा आहे. भाजपच्या काळात कोणताही विकास झाला नाही. रुपया नीचांकी पातळीवर आहे. आधी पीएम मोदी म्हणायचे की ज्या देशाचा पंतप्रधान कमकुवत असतो, त्यांचा रुपया घसरतो. आता तेच होते आहे. हा कसला विकास?"
જામનગર ના મારા તમામ મિત્રો ને મારુ દીલ થી આમંત્રણ છે. જય માતાજી🙏🏻 pic.twitter.com/olZxvYVr3t
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 13, 2022
आपल्या भावाच्या पत्नीविरोधात प्रचार करण्याचे काही अंशी दु:खही नयनाच्या बोलण्यातून दिसत होते. ती म्हणाली, "वैचारिकदृष्ट्या मी त्या लोकांपासून फार पूर्वीपासून वेगळे झाले आहे. राजकीयदृष्ट्या मला तसे वाटत नाही. आमच्या घरातील सर्व सदस्य आम्ही तिघे भाऊ बहिणी आहोत. आम्ही सगळे मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहोत. त्यामुळे मी या गोष्टी मनावर घेत नाही. मी फार पूर्वीच त्यांच्यापासून मनाने वेगळी झाले आहे आणि माझ्या तत्त्वांचे पालन करत आहे. मी ४ वर्षांपासून काँग्रेसशी संबंधित आहे. त्यामुळे रवींद्र किंवा रिवाबा मला प्रचारापासून रोखू शकत नाहीत आणि मीदेखील त्यांना काही बोलत नाही. मी पक्षाची जिल्हाप्रमुख होते. त्यामुळे मी पक्षाच्या उमेदवारासाठी मते मागत आहे," असेही नयना जाडेजाने सांगितले.