अहमदाबाद : पुढील वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटीदारांची आरक्षणाची मागणी हा मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता असून, सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांना १० टक्के आरक्षणाची घोषणा करून हा मुद्दा थंड पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना अत्यल्प यश मिळण्याची चिन्हे आहेत. तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात पाटीदारांनी केलेल्या नऊ महिन्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले होते. त्यानंतर राज्य सरकारने अलीकडेच आरक्षणाची घोषणा करून या समुदायाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटीदार अनामत आंदोलन समितीने सरकारचा तोडगा फेटाळून लावला. यापूर्वी राज्य सरकारने पटेल आरक्षण आंदोलनाच्या प्रत्युत्तरात सवर्णांमधील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीकरिता ‘मुख्यमंत्री युवा स्वावलंबन योजना’ जाहीर केली होती. अर्थात सरकारचा हा प्रयत्नही अपयशी ठरला. काँग्रेसने सरकारचे हे पाऊल म्हणजे पाटीदारांना दाखविण्यात आलेले लॉलीपॉप असल्याचे सांगून येत्या निवडणुकीत पक्षाची सत्ता आल्यास ईबीसीचे आरक्षण वाढवून २० टक्के करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेस २५ वर्षांपासून सत्तेबाहेरपटेल आरक्षण आंदोलनानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत प्रथमच विजय मिळविणारी काँग्रेस २५ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेबाहेर आहे, पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्याची अपेक्षा तिला आहे. गुजरातच्या राजकारणात नरेंद्र मोदींसारख्या दिग्गज नेत्यांची उणीव आणि आरक्षण आंदोलनासारख्या मुद्द्यामुळे भाजपाला २०१७च्या विधानसभा निवडणुकीत आपली बाजू बळकट ठेवण्यास अडचणी येत आहेत. ।गुजरात काँग्रेसचे महासचिव निशीत व्यास यांनी सांगितले की, निवडणुकीवर आरक्षण मुद्द्याचा प्रभाव असेल. त्यांची मागणी योग्य आहे. सवर्णांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा फार विलंबाने झाली असून, ते अत्यल्प आहे. आमचा पक्ष सत्तेत आल्यास ईबीसींना २० टक्के आरक्षण देण्यात येईल. १० टक्के आरक्षणाचा निर्णय पटेल समुदायाने व्यापकपणे स्वीकारला असून, केवळ काही सदस्यांना हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे, असा दावा भाजपाने केला. भाजपाचे प्रवक्ते हर्षद पटेल म्हणाले की, पाटीदार अनामत आंदोलन समितीतील काही काँग्रेसचा पाठिंबा असलेले सदस्य आमच्या घोषणेला विरोध करीत आहेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीवर पाटीदार आरक्षण भारी पडणार
By admin | Published: May 17, 2016 4:37 AM