अहमदाबाद:गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगानं एका प्रकरणात दिलेला निकाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अहमदाबादमधील विनोदभाय जोशी यांनी त्यांच्या पत्नीशी कायदेशीर पद्धतीनं घटस्फोट घेतला आहे. पण जोशी यांच्या बँकेकडून त्यांचं एटीएम कार्ड चुकून काडीमोड घेतलेल्या पत्नीकडे सोपविण्यात आलं. त्यानंतर जोशी यांच्या खात्यातून १ लाख ६६ हजार रुपये काढण्यात आले. बँकेनं केलेल्या या चुकीची भरपाई म्हणून 'अॅक्सीस बँके'ला विनोदभाय जोशी यांना १ लाख ६६ हजार रुपयांसह त्यावर ७ टक्के व्याज देण्याचे आदेश गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोजनं दिलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विनोदभाय जोशी हे कलोल शहराजवळील नरदीपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचं आपल्या मुलासह अॅक्सीस बँकेत जॉइंट अकाऊंट आहे. या खात्याचं एटीएम कार्ड बँकेनं उपलब्ध करुन दिलं होतं. पण ते हरवल्यानंतर जोशी यांनी पुन्हा एकदा बँकेत नव्या एटीएम कार्डसाठी अर्ज केला होता. बँकेकडून विनोदभाय जोशी यांना एटीएम कार्ड त्यांच्या पत्त्यावर आलंच नाही. हे प्रकरण २००९ सालं असून त्यानंतर वर्षभरानं २६ ऑगस्ट २०१० साली जोशी बँकेत आपल्या खात्यातून १० हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या खात्यात अपेक्षित राशी जमा नसल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आणि जोशी यांना धक्काच बसला. त्यांनी बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर त्यांच्या खात्यातून एटीएमच्या माध्यमातून १ लाख ६६ हजार ९०० रुपये काढण्यात आल्याचं लक्षात आलं.
जोशी यांनी बँकेकडे एटीएम कार्ड मिळालच नसल्याची तक्रार केली. बँकेनं सर्व चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की एटीएम कार्ड बँकेकडून चुकून जोशी यांच्या विभक्त झालेल्या पत्नीच्या पत्त्यावर पाठवलं गेलं होतं. जोशी यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरत भरपाईची मागणी केली. २००५ सालीच आपण कायदेशीररित्या पत्नीशी घटस्फोट घेतल्याचं त्यांनी बँकेला दाखवलं. पण एटीएम कार्ड जोशी यांनाच पाठवलं असून त्यांच्याकडूनच संबंधित रक्कम एटीएममधून काढण्यात आल्याचा दावा बँकेकडून केला गेला. त्यामुळे जोशी यांनी थेट ग्राहक निवारण कक्षाचा दरवाजा ठोठावला.
प्रकरणाच्या चौकशीदरम्यान एक मोठा पुरावाच जोशी यांच्या हाती लागला. संबंधित बँकेकडून जोशी यांच्या विभक्त झालेल्या पत्नीच्याच पत्त्यावर एटीएम कार्ड पाठवलं गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज जोशी यांनी सादर केलं. संपूर्ण प्रकरणाची तपासणी केल्यानंतर यात बँकेनं चूक केल्याचं निष्पन्न झालं आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगानं बँकेला जोशी यांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्यांच्या रकमेवरील ७ टक्के व्याजही जोशी यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २०१० सालापासूनचं व्याज बँकेनं जोशी यांच्या खात्यात जमा करायला हवं असे आदेश देण्यात आले आहेत.