अहमदाबाद: गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात वाघाचं दर्शन घडलं आहे. 1989 पासून गुजरातमध्येवाघ दिसला नव्हता. त्यामुळे गुजरातमधील प्राणीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. हा वाघ नेमका गुजरातमधलाच आहे की तो शेजारच्या राज्यातून आला आहे, याचा शोध सध्या सुरू आहे. हा वाघ गुजरातचाच असल्याचं सिद्ध झाल्यास, सिंह, बिबट्या आणि वाघ यांचं वास्तव्य असलेलं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरेल. याबद्दलचा तपास सध्या सुरू असला तरी, राज्यात आनंदाची लाट उसळली आहे.गुजरातमधले सिंह जगप्रसिद्ध आहेत. देशाच्या इतर भागांमध्ये बिबट्या आणि वाघ पाहायला मिळतात. मात्र सिंहांचं दर्शन केवळ गुजरातमध्येच घडतं. गिर अभयारण्यात आशियाई सिंह पाहायला मिळतात. याशिवाय गुजरातमध्ये बिबट्यादेखील पाहायला मिळतो. मात्र गेल्या 30 वर्षांपासून राज्यात वाघ दिसला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वीच महिसागर जिल्ह्यात एका शिक्षकाला वाघ दिसला. त्यामुळे राज्यातील वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला.'महिसागर जिल्ह्यात एका व्यक्तीला वाघ दिसला आहे. त्यामुळे वाघ, सिंह आणि बिबट्या यांचं वास्तव्य असलेलं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरेल,' असं मुख्य वन्य संवर्धक (वन्यजीवन) ए. के. सक्सेना म्हणाले. सध्या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. हा वाघ मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्रातून आला की गुजरातमध्येच त्याचं वास्तव्य आहे, याचा शोध सध्या घेतला जात असल्याची माहिती सक्सेना यांनी दिली. गुजरातमध्ये वाघाचं वास्तव्य आहे, ही बाब आनंददायक असल्याचं राज्याचे वनमंत्री गणपत वसावा म्हणाले. राज्यात व्याघ्र संवर्धनासाठी कॉरिडॉर विकसित केला जाऊ शकतो. यासाठी राज्याच्या वन विभागानं केंद्रातील तज्ज्ञांची मदत मागितल्याचंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रशासनाला सतर्क राहण्याची सूचना करण्याती आल्याची माहितीदेखील वसावा यांनी दिली. गुजरातमधील सिंहांनी इतर राज्यांमध्ये हलवण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आला. देशाच्या इतर भागांमध्येही सिंहांची संख्या वाढवावी, या हेतूनं हे प्रयत्न केले गेले. मात्र त्यात फारसं यश आलेलं नाही. त्यामुळे आशियाई सिंह केवळ गुजरातमध्येच आढळून येतात. देशातल्या इतर कुठल्याच राज्यात वाघ, सिंह आणि बिबट्या दिसत नाहीत, त्यामागे हेच कारण आहे.
गुजरातची शान वाढली; सिंह, बिबट्यासोबत घुमली वाघोबाची डरकाळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:19 PM