सरकार आमचं ऐकत नाही; भाजपा आमदाराचा थेट राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 09:34 PM2020-01-22T21:34:07+5:302020-01-22T21:40:54+5:30
भाजपा आमदार म्हणतो, माझ्या राजीनाम्याला सरकार आणि सरकारी कर्मचारी जबाबदार
अहमदाबाद: गुजरातचे भाजपाआमदार केतन इनामदार यांनी राजीनामा दिला आहे. इनामदार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. आपल्या राजीनाम्यासाठी त्यांनी रुपाणी सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारकडून आपलं म्हणणं ऐकलं जात नाही, असा आरोप इनामदार यांनी केला आहे.
'माझ्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मी सरकार आणि प्रशासनासमोर ठेवल्या. मात्र सरकार आणि सरकारी बाबूंनी वेळकाढूपणा केला. सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवत नाहीत. यामुळेच मी आमदारकीचा राजीनामा देत आहे,' असं इनामदार यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केलं आहे. इनामदारांच्या राजीनाम्यामुळे भाजपाचं विधानसभेतलं संख्याबळ १०३ वरुन १०२ वर आलं आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेची निवडणूक होण्याआधी गुजरातमध्ये भाजपाला इनामदार यांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला आहे.
आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन, असं इनामदार यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसनं इनामदार यांना स्वत:कडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या निवडणुकीत इनामदार सावली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
गुजरात में भाजपा सरकार से ना सिर्फ गुजरात की जनता बल्कि उनके खुद के विधायक इस स्तर तक नाराज़ है कि सावली से विधायक केतन इनामदार ने अपना इस्तीफा दे दिया।
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) January 22, 2020
सुशासन वाली भाजपा सरकार जो अपने विधायकों की नहीं सुन रही और उनकी मांगों को अनदेखा कर रही है वो जनता की परेशानी क्या हल करेगी? https://t.co/MQaYcyOMt4
इनामदार यांच्या राजीनाम्यानंतर गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी भाजपाला लक्ष्य केलं. गुजरातमधील भाजपा सरकारवर जनताच नव्हे, तर त्यांचे आमदारदेखील नाराज आहेत. त्यामुळेच सावलीचे आमदार केतन इनामदार यांनी राजीनामा दिला आहे. स्वत:च्या आमदारांचं न ऐकणारा पक्ष जनतेचं काय ऐकणार आणि त्यांच्या समस्या कशा सोडवणार?, असे प्रश्न सातव यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.