नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तस सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अनेक नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान गुजरातमधीलभाजपा आमदाराने कोरोना संसर्गासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. "भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही" असं म्हटलं आहे.
राजकोट (दक्षिण) मतदारसंघाचे भाजपा आमदार असणाऱ्या गोविंद पटेल (Govind Patel) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनत करतात त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही असं पटेल यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे असं तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना पटेल यांनी हे विधान केलं आहे. "जे खूप मेहनत करतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. भाजपाचे कार्यकर्ते खूप मेहनती आहेत. त्यामुळेच भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही" असं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या महिन्यामध्ये स्थानिक निवडणुकांसाठी प्रचार करताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना देखईल कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचबरोबरच राज्यामध्ये पक्ष संघटनेचे प्रमुख सी. आर. पाटील यांच्यासहीत सत्ताधारी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ गेला आहे. वडोदऱ्याचे भाजपाचे खासदार रंजनबेन भट्ट यांनी शनिवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. उपचारांसाठी आपण रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचंही भट्ट यांनी सांगितलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी स्थानिक निवडणुका आणि अहमबादामध्ये कसोटी तसेच टी-२० मालिका आयोजित केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा दावा फेटाळून लावला आहे. "संविधानातील तरतुदींनुसार स्थानिक निवडणुका घेण्यात आल्या आहेत. क्रिकेटचे सामने केवळ अहमबादामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढीला या दोन गोष्टी कारणीभूत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. महाराष्ट्रात निवडणुकाही झाल्या नाहीत आणि क्रिकेटचे सामनेही झाले नाहीत. मात्र देशामध्ये कोरोना संसर्गाची रोजची जी आकडेवारी समोर येत आहे त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत" असं म्हटलं आहे.
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर सध्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. रावत यांनी "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या विधानाने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. "कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं" असं रावत यांनी म्हटलं आहे.