गुजरातमधील लोकसभा निवडणुकीत एक जागा गमावल्याबद्दल गुजरातभाजपाचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. तिसऱ्यांदा सर्व 26 जागा जिंकल्या नसल्याची खंत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.
गुजरातमधील लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपाला सर्व २६ जागा जिंकून हॅट्ट्रिक करता आली नाही. गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी आर पाटील आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषदेत एक जागा गमावल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आणि कुठे चुका झाल्या याचा आढावा घेतला जाईल, असं सांगितलं.
आता केंद्रीय मंत्री बनून सुरतला परतलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी बैठकीमध्ये पराभव झाल्याबद्दल आपल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आभार प्रदर्शन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा प्रदेशाध्यक्षांनी याबाबत माहिती दिली.
"कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, तरीही आम्ही आमची एक जागा गमावली, त्यासाठी मी कोणतंही कारण देणार नाही, विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच असल्याचं ते म्हणाले. माझ्यामध्येच काहीतरी कमतरता राहिली ज्यामुळे आम्ही फक्त ३०,००० मतांच्या फरकाने एक जागा गमावली. यासाठी मी कार्यकर्त्यांची माफी मागतो."
"आपल्या भाषणात गुजरातच्या रेकॉर्डबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत गुजरात भाजपा नवा रेकॉर्ड करते आणि यावेळीही आपण त्यात मागे राहिलेलो नाही. गुजरातमध्ये भाजपाची एक जागा कमी झाली असली तरी मतं वाढली आहेत."
"२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ९० लाख मतं मिळाली होती, जी या लोकसभा निवडणुकीत १.१ कोटी झाली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १.६८ कोटी मतं मिळाली होती, जी यावेळी लोकसभा निवडणुकीत १.८३ कोटी झाली" असं म्हटलं आहे.
गुजरात भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाची सोमवारी एक महत्त्वाची आढावा बैठक होणार असून त्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा होणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक दिवसभर सुरू राहणार असून त्यात गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, संघटन सरचिटणीस रत्नाकर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि सर्व २५ उमेदवार उपस्थित राहणार आहेत.