राजकोट: गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. रूपाणी यांच्या स्कूटर रॅलीमध्ये अत्यंत कमी गर्दी असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही स्कूटर रॅली फ्लॉप झाल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. आम आदमी पक्षाचे माजी नेता आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना भूषण यांनी, ''गुजरात मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची राजकोटमधील स्कूटर रॅली...व्हिडीओ पाहून ते आमची स्थिती खराब आहे असं का म्हणतात हे समजू शकतो'' असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी विजय रूपाणी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यामध्ये ते स्थिती खराब असल्याचं म्हणतात, त्यावरून भूषण यांनी खोचक टीका केली आहे.
व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री रूपाणी एका स्कूटरच्या मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. त्यांनी हेल्मेट घातलेलं नाही, शिवाय रॅलीमध्ये अर्ध्याहून अधिक लोकांनी हेल्मेट घातलेलं नाही. रॅलीमध्ये जवळपास केवळ 25 स्कूटर दिसत आहेत, याशिवाय बरेच सुरक्षारक्षक मुख्यमंत्र्यांच्या स्कूटरसोबत धावताना दिसत आहेत. 23 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये केवळ 50 च्या आसपास लोक दिसत आहेत.