हरनी तलाव दुर्घटनेत 12 मुलांचा मृत्यू झाल्याने वडोदरात शोककळा पसरली आहे. सर्व मुलं न्यू सनराईज स्कूलमध्ये शिकत असून गुरुवारी ते पिकनिकसाठी आले होते. मुलांच्या पालकांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. लग्नानंतर 17 वर्षांनी एका जोडप्यावा अपत्यप्राप्ती झाली होती. मात्र या बोट दुर्घटनेत अजवा रोडवर राहणाऱ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. मुलगा इयत्ता दुसरीत आणि बहीण तिसरीमध्ये शिकत होती.
कुटुंबातील एका नातेवाईकाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, तलावातून बाहेर काढल्यानंतर दोन्ही मुलांना खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. दोन्ही मुलांचा जन्म त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नाला 17 वर्ष झाल्यानंतर झाला होता. पती-पत्नीने वर्षानुवर्षे विविध धार्मिक स्थळी जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांना दोन मुलं झाली होती.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटना झाली त्यावेळी मुलांचे वडील युनायटेड किंग्डममध्ये होते. ते वडोदरा येथे रवाना झाले आहेत. पानीगेट मशिदीचे मुफ्ती इम्रान म्हणाले की, कुटुंबीयांनी एसएसजी रुग्णालयाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. या ठिकाणी मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले. वडील परतल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह दफन करण्यात येणार आहेत.
क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मुलं रांगेत उभी होती अन् समोर मृत्यू...; हृदयद्रावक CCTV Video
सोशल मीडियावर या दुर्घटनेच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये न्यू सनराईज स्कूलचे विद्यार्थी बोट राईडसाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, विद्यार्थी एका रांगेत उभं राहून बोटवर जाण्याची वाट पाहत होते. रिपोर्टनुसार, विद्यार्थी आणि शिक्षक दुपारी 4.30 च्या सुमारास पिकनिकसाठी तलावावर पोहोचले आणि एका बोटीवर गेले, जी ओव्हरलोडमुळे उलटली. हरनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, या दुर्घटनेत 14 मुलं आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. वाचवण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यावर एसएसजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.