गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भीषण पूल दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. विजय यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
गोस्वामी हे कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काही तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणं देखील अवघड झालं होतं. याबाबत पूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र त्यांनी कारवाई केली नाही."
"पूल कर्मचाऱ्यांना परिसरातून निघण्यापूर्वी सतर्क केले होतं”
"मी पूल कर्मचाऱ्यांना या परिसरातून निघण्यापूर्वी सतर्क केलं होतं. हा पूल हलवण्यापासून लोकांना थांबवा, असंही सांगितले होतं. मात्र त्यांचा रस केवळ तिकीट विक्रीमध्ये होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले" अशी माहितीही विजय गोस्वामी यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय.
१७७ जणांना वाचवण्यात यश
दरम्यान, बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आलीये. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.
पूल दुरुस्तीसाठी सहा महिने होता बंद
या घटनेतील जखमींपैकी काही जणांना राजकोटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तर काही जणांना मोरबी सिव्हील हॉस्पीटल आणि अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी ३० रुग्णवाहिकांनादेखील तैनात करण्यात आलेय. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्या राज्यात इतकी मोठी दुर्घटना घडली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"