अहमदाबाद - गुजरातेत काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना सुरु असताना मुख्यमंत्री विजय रुपानी त्यांच्या राजकोट पश्चिम मतदारसंघात तिस-या फेरीअखेर 7600 मतांनी आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाला अपेक्षेपेक्षा चांगली लढत देत असून दोन्ही पक्षांमध्ये आघाडी-पिछाडीचा खेळ सुरु आहे. गुजरातमध्ये निकाल जाहीर होत असताना सर्वांचेच लक्ष राजकोट पश्चिमच्या निकालाकडे लागले आहे.
राजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला असून इथून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरु यांनी त्यांना आव्हान दिले आहे. पेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत. इंद्रनील राजगुरु पूर्ण तयारीनिशी ठरवून राजकोट पश्चिमच्या मैदानात उतरल्याने इथे अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे चित्र होते. कधी नव्हे ती काँग्रेसला इथे अनुकूलस्थिती निर्माण झाली होती. खरतर इंद्रनील राजगुरु यांचा दुसरा मतदारसंघ होता पण फक्त रुपानी यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी राजकोट पश्चिम मतदारसंघ मागून घेतला. 1985 सालापासून एकदाही राजकोट पश्चिममधून भाजपाने पराभव पाहिलेला नाही. राजकोट पश्चिममधून निवडणून आलेल्या उमेदवाराने सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे.
इंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिमची निवड करण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. वाजूभाई वाला, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ अशी राजकोट पश्चिमची ओळख आहे. वाजूभाई वाला आता कर्नाटकाचे राज्यपाल आहेत, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी 2001 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर या जागेवरुन विजय रुपानी यांना संधी मिळाली. त्यावेळी रुपानी 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते.