नवी दिल्ली, दि. 27 - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भगवान रामाच्या बाणांची तुलना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या मिसाइलसोबत केली आहे. शनिवारी इन्स्टीट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी रिसर्च अॅन्ड मॅनेजमेंट (आईआईटीआरएएम) च्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. रामायणात रामाच्या ज्या बाणांचा उल्लेख करण्यात आलाय ते इस्त्रोचं मिसाइल आहेत, असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी पायाभूत सुविधा आणि सोशल इंजिनिअरिंगचं श्रेय देखील रामाला दिलं.
शनिवारी इन्स्टीट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी रिसर्च अॅन्ड मॅनेजमेंट (आईआईटीआरएएम) च्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, रामाचा एक-एक बाण म्हणजे मिसाइल होता. रामाने लोकांची सुटका करण्यासाठी त्याचा वापर केला होता. रामाच्या इंजिनिअरिंगमधील कौशल्याबाबत बोलताना त्यांनी रामसेतूचं उदाहरण दिलं. आज देखील त्यांनी बनवलेला सेतू चर्चेचा विषय आहे, यावरून ते कोणत्या दर्जाचे इंजिनिअर होते याची कल्पना करता येऊ शकते असं मुख्यमंत्री रूपानी म्हणाले.
'रामायणात लक्ष्मण बेशुद्ध झाल्यानंतर उत्तर भारतात सापडणा-या एका वनौषधीने त्यांची प्रकृती सुधरू शकते असं समजलं. पण कोणती वनौषधी आणायची आहे हे हनुमान विसरले आणि त्यांनी संपूर्ण पर्वत उचलून आणला होता. त्यावेळी असं कोणतं तंत्रज्ञान होतं जे पर्वत उचलयाला मदत करू शकेल', असा प्रश्न विचारताना ही देखील पायाभूत सुविधांच्या विकासाची कथा आहे असं विजय रूपानी म्हणाले.