नवी दिल्ली - एखाद्या चौकाचं, ठिकाणाचं अथवा शहराचं नाव बदलण्यासाठी सरकार आणि नेतेमंडळी आग्रही असतात. त्यामुळेच ते अनेकदा चर्चेत देखील असतात. गेल्या काही दिवसांपासून शहरांच्या नामांतराची चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता शहरांवरून हा मोर्चा फळांकडे वळवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये थेट फळाचं नाव बदलण्यात आलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली आहे.
ड्रॅगन फ्रूट या नावाने प्रसिद्ध असलेलं फळ यापुढे गुजरातमध्ये "कमलम" म्हणून ओळखलं जाणार आहे. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. "राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याचा बाहेरून आकार हा कमळासारखा आहे. त्यामुळेच आता ड्रॅगन फ्रूटचं नाव हे कमलम असं ठेवण्यात आलं आहे. आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला" असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.
ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्यामागे कोणतंही राजकारण नसल्याचं देखील विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील काही भागात शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. या भागात मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ड्रॅगन फ्रूटचे अनेक फायदे आहेत. रक्तदाब, मधुमेह, शारीरीक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूट लोकप्रिय आहे. त्यामुळे आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताण-तणावामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आजारांवर इतर विशेष उपचारांसह प्रतिबंधक उपाय म्हणून ड्रॅगन फ्रूट उत्तम पर्याय असल्याचं मानलं जातं. ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करतं. तसेच वजन कमी करण्यासही मदत करतं. आरोग्यासाठी ड्रॅगन फ्रूट हे अत्यंत गुणकारी मानलं जात असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी केली जाते.