स्थानिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या गुजरातचेमुख्यमंत्री विजय रुपाणी यांची तब्येत अचानक बिघडल्याने व्यासपीठावर कोसळल्याची घटना रविवारी घडली होती. भाषण करताना मुख्यमंत्री रूपाणी यांना चक्कर आली आणि ते मंचावर खाली कोसळले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्यांना त्यानंतर बडोद्याहून अहमदाबाद येथे आणलं होतं. दरम्यान, विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये सध्या ६ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याच प्रचारासाठी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे बडोदा येथे पोहचले होते, याठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री रुपाणी यांना चक्कर आली. त्यांचा बीपी कमी झाल्याचं सुरूवातीला डॉक्टरांनी सांगितलं होतं. विजय रुपाणी यांना बडोदा येथून सरकारी विमानानं अहमदाबाद येथे आणण्यात आलं. त्यांना अहमदाबादच्या यु.एन. मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याची माहिती समोर आली आहे.