अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरासाठी नियुक्त झालेले नवनिर्वाचित पुजारी मोहित पांडे यांचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याप्रकरणी अयोध्या पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरं तर मोहित यांचा डीपफेक फोटो तयार करण्यात आला आहे. बनावट फोटो पोस्ट करणाऱ्यांना अयोध्या पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच गुजरातमधील काँग्रेस नेते हितेंद्र पिठाडिया यांना अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. अयोध्येतील राम मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. मागील काही दशकापासून देशाचं राजकारण ज्या वास्तूभोवती फिरत होतं ती वास्तू म्हणजे उत्तर प्रदेशामधील अयोध्येतील राम मंदीर.
दरम्यान, नवीन वर्षात २२ जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह नामांकित मंडळी हजेरी लावणार आहेत. याशिवाय दानशूर व्यक्तींना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. राम मंदिरासाठी पुजारी म्हणून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
कोण आहेत मोहित पांडे?दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठाचे विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्येच्या राम मंदिरात पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतींमधून २० जणांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी एक मोहित आहेत. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हे सीतापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे शिक्षण घेतले. सामवेदचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यचे शिक्षण घेण्यासाठी ते तिरूपतीला गेले. आचार्यची पदवी घेतल्यानंतर ते पीएचडीची देखील तयारी करत आहेत. अशातच त्यांनी राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता, त्यात त्यांची निवड झाली.
पगार किती?अलीकडेच राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचं वेतन ३२,९०० रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्याचा पगार ३१,९०० रुपये करण्यात आला. पूर्वी मुख्य पुजाऱ्याला २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्याला २० हजार रुपये मिळत होते. तसेच इतर पुजारी आणि सेवकांच्या पगारातही वाढ करण्यात आली. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यापूर्वी येथील मुख्य पुजारी आणि सहाय्यक पुजारी यांचे पगार खूपच कमी होते. त्या काळात मुख्य पुजाऱ्यांना केवळ १५,५२० रुपये तर सहाय्यक पुजाऱ्यांना ८,९४० रुपये एवढा पगार मिळत होता. वाढती महागाई पाहता मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पगार वाढवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने मे महिन्यात पहिली वेतनवाढ दिली आणि मुख्य पुजाऱ्यांना २५ हजार आणि सहाय्यक पुजाऱ्यांना २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा ऑक्टोबर महिन्यात मुख्य पुजाऱ्यांचा पगार २५ हजारांवरून ३२ हजार ९०० रुपये तर त्यांच्या सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार ३१,००० रुपये करण्यात आला आहे.