गांधीनगर : गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपाला नामोहरम करणाऱ्या गुजरातमध्येकाँग्रेसला मोठा धक्का बसणार असून आमदार अल्पेश ठाकोर जवळपास 6-7 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज दुपारी अल्पेश ठाकोर याबाबतची घोषणा करणार आहेत. गुजरातमध्येकाँग्रेस आमदार जवाहर चावडा यांनी राजीनामा दिला. विधानसभाध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सुपूर्द केला.
गुजरातमध्ये येत्या 12 मार्चला काँग्रेसची बैठक होणार आहे. याच्या तयारीमध्ये काँग्रेसचे नेते लागले आहेत. राहुल गांधीही या बैठकीला येणार आहेत. यावेळी पटेल आरक्षणाचे नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असतानाच ज्यांच्या जोरावर काँग्रेसने विधानसभा लढविली होती ते अल्पेश ठाकोर पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत.
अल्पेश हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. गुरुवारी त्यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले असून आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत. यापूर्वी ते क्षत्रिय ठाकोर सेनेशी चर्चा करणार आहेत. ठाकोर सेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे एका काँग्रेसच्या नेत्याने मान्य केले आहे.
गुरुवारी अल्पेश यांनी सेनेची बैठक बोलावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरविण्यात येत आहेत. शुक्रवारी याबाबत मोठी घोषणा करणार आहे. तेव्हाच पुढील निर्णय सांगेन.
यावर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ठाकोर यांच्याशी चर्चा झाली का, असे विचारले असता त्यांनी हे ठाकोर यांनाची विचारा असे सांगितले. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी गुरुवारी बडोद्यामध्ये काँग्रेसचा कोणताही आमदार भाजमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गुजरातमधील बलात्कार प्रकरण जबाबदार?
एका अल्पवयीन मुलीवर उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये घडली. यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर हल्ले केले जात होते. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीयांनी गुजरात सोडलं आहे. यावरुन अल्पेश ठाकोर वादात सापडले होते. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना असल्याचा आरोप होत होता. याबद्दलचा ठाकोर यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता. यानंतर आता ठाकोर यांनी सारवासारव सुरू केली होती. विशेष म्हणजे अल्पेश ठाकोर अडचणीत सापडल्यावर काँग्रेसनंदेखील हात वर केले होते. ठाकोर दोषी असतील, तर त्यांना अटक करण्यात यावी, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती. अल्पेश यांचे मित्र समजले जाणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील सावध भूमिका घेतली होती. जर हिंसाचारमागे अल्पेश ठाकोरांचा हात असेल, तर त्यांना अटक केली जावी, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली होती.