काँग्रेसला या दुसऱ्या राज्यातही बसणार दणका, 14 आमदारांचे केले एअरलिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 02:43 PM2020-03-15T14:43:15+5:302020-03-15T14:52:04+5:30
काँग्रेसने या आमदारांना जयपूरमधील शिव विलास हॉटेलमध्ये ठेवले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा गुजरातमधून आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखत आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाचे कमळ हातात घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच धास्तावला आहे. मध्यप्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही भाजपाकडूनआमदारांची फोडाफोड होऊ शकते यामुळे काँग्रेसने शनिवारी रात्री आपल्या १४ आमदारांना जयपूरला एअरलिफ्ट केले आहे. मात्र असे असले तरीही काँग्रेसची भीती मात्र अद्याप कायम आहे. येत्या २६ तारखेला राज्यसभेची निवडणूक होत आहे.
काँग्रेसने या आमदारांना जयपूरमधील शिव विलास हॉटेलमध्ये ठेवले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा गुजरातमधून आपल्या तीन उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखत आहे. यावर बोलताना भाजपाचे उमेदवार नरहरी अमीन यांनी, ही तोड-फोड नसून गेम असल्याचे म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे आमदार हिंमत सिंह पटेल यांनी, 'आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. त्यामुळे हा एक रणनीतीचा भाग आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असतानाही काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरमधेच ठेवले होते.
गुजरातमधील चार राज्यसभा जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने अभय भारद्वाज, रमीराबेल बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवले आहे. अमीन यांनी २०१२ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून त्यांना क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.