नवी दिल्ली – गुजरातच्या वडोदरा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाच्या पत्नीनं आई होण्यासाठी हायकोर्टात पतीचे स्पर्म जमा करण्याची परवानगी मागितली होती. ३२ वर्षीय कोरोना रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला. गेल्या ४ महिन्यापासून हा रुग्ण कोरोनाशी एकाकी झुंज देत होता. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाद्वारे (एआरटी) आई होण्याची इच्छा असलेल्या पत्नीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (Sperm Of Critical Covid Patient Collected)
२९ वर्षीय पत्नीच्या याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी झाली. तेव्हा गुजरात हायकोर्टानं स्पर्म संरक्षित करण्याचे निर्देश दिले. हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं की, वडोदराच्या स्टर्लिग हॉस्पिटलमध्ये कोविड १९ मुळे ग्रस्त असलेल्या रुग्णाला १० मे रोजी उपचारासाठी दाखल केले होते. ईसीएमओवर असलेल्या या व्यक्तीचं गुरुवारी निधन झालं. निमोनियामुळे रुग्णाच निधन झाल्याची माहिती स्टर्लिंग हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. मयूर डोधिया यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. या मृत रुग्णाच्या आईवडिलांनी आणि पत्नीने इन विट्रो फर्टिलाइजेशन(IVF) प्रक्रियेसाठी एआरटी करण्याची परवानगी मिळावी यासाठी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशावरून हॉस्पिटलनं टेस्टिकुलर स्पर्म एक्सट्रैक्शनद्वारे स्पर्म जमा केले. बुधवारी शहरातील IVF लॅबमध्ये स्पर्म सुरक्षितपणे ठेवले. गुजरात हायकोर्टात पत्नीने म्हटलं होतं की, माझे पती २४ तासांहून अधिक जिवंत राहू शकत नाहीत त्यामुळे भविष्यात आई बनण्यासाठी स्पर्म संरक्षित करण्याची परवानगी द्यावी. रुग्ण बेशुद्ध असल्यानं हॉस्पिटल प्रशासन नकार देत असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. रुग्णाची बिकट अवस्था पाहून हायकोर्टाने हॉस्पिटलला स्पर्म सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी २३ जुलै म्हणजे आज होणार आहे. त्यामुळे आता कोर्ट पत्नीला आई होण्यासाठी एआरटी प्रक्रियेतून जाण्याची परवानगी देणार की नाही याचा निर्णय होईल.
काय आहे प्रकरण?
गुजरातमध्ये एका महिलेने आजारी रुग्णाच्या स्पर्म(Sperm)साठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. या महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे. मागील ४ महिन्यापासून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णाची अवस्था इतकी गंभीर आहे की शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केले आहे. रुग्ण बेशुद्ध अवस्थेत आहे. अशा स्थितीत रुग्णाच्या बायकोने आई होण्याची इच्छा व्यक्त केली. आजारी पतीच्या IVF नमुन्याची त्यासाठी गरज आहे. परंतु हॉस्पिटलनं IVF नमुन्यासाठी तिच्या पतीची मंजुरी असणं गरजेचे आहे म्हटलं. आजारी पती बेशुद्ध आहे त्याच्याकडे २४ तास शिल्लक आहेत. अशावेळी महिलेने कायदेशीर मार्ग निवडत हायकोर्टात याचिका दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता हायकोर्टात तातडीनं सुनावणी करण्यात आली. त्यानंतर हायकोर्टाने पतीचे स्पर्म सुरक्षित ठेवण्याचे आदेश हॉस्पिटलला दिले होते.