गुजरातमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे काळ्या जादूच्या माध्यमातून अलौकिक शक्ती आणि पैसे मिळवण्यासाठी एका तांत्रिकाने तब्बल १२ जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी तब्बल १२ वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला. तसेच त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून ही हादरवणारी माहिती समोर आली आहे. मात्र या तांत्रिक आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा संपूर्ण पर्दाफाश होणं कठीण होऊन बसलं आहे.
या प्रकरात अहमदाबादमधील सरखेज पोलीस आणि झोन ७ एलसीबीच्या संयुक्त पथकाने नवलसिंह कनुभाई चावडा नावाच्या या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. कोर्टाने ७ आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मिळालेल्या माहितीमधून आरोपी एक युट्युब चॅनेल देखील चालवत असल्याचं समोर आलं आहे. या आरोपींनी अहमदाबादमधील एका व्यापाऱ्याला चार पट पैसे देण्याचं आमिष दाखवून बोलावलं होतं. याचदरम्यान, नवलसिंह चावडा याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना त्याची खबर दिल आणि पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मात्र आता आरोपी नवलसिंह चावडा याचाही पोलीस कोठडीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे.
चौकशीमधून या आरोपीने १३ वर्षांत १२ जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीची लोकांना मारण्याची पद्धतही थरकाप उडवणारी होती. आरोपी पीडितांना द्रव पदार्थामधून सोडियम नायट्रेडची मात्रा द्यायचा. त्यानंतर काही वेळातच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून संबंधित व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. आरोपी तांत्रिक हा लोकांना पैसे चार पट करून द्यायचं आमिष दाखवायचा. त्यानंतर सावज तावडीत सापडल्यावर त्यांची हत्या करायचा. आरोपीने उज्जैन येथील आपल्या गुरूकडून काळी विद्या शिकली होती. त्या गुरूनेच सोडियम नायट्रेडच्या माध्यमातून लोकांचा जीव घेता येतो, याची कल्पना आरोपीला दिली होती. आरोपीने त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांचीही हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. याबाबत अहमदाबाद झोन ७ चे डीसीपी शिवम वर्मा यांनी सांगितले की, आरोपी नवलसिंह याला ३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अटक करण्यात आली. त्याने १२ हत्या केल्याचे कबुल केले आहे. त्यात राजकोटमध्ये ३, सुरेंद्रनगरमध्ये ३, अहमदाबादमध्ये १, अंजार येथे १ वाकानेर येथे १ आणि आपल्याच कुटुंबातील ३ सदस्य अशा एकूण १२ जणांचा त्याने जीव घेतला.
आरोपी नवलसिंह हा सुरुवातीला पैसे दुप्पट करण्यासाठी लोकांना फोन करायचा. त्यानंतर गिऱ्हाईक सापडल्यावर पाणी आणि दारूमध्ये सोडियम नायट्रेड मिसळून प्यायला द्यायचा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांतच संबंधित व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. तसेच पोलिसांनाही याचा संशय येत नसे.
दरम्यान, आरोपीला अटक करून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या पोलीस कोठडीदरम्यान आरोपीची प्रकृती अचानक बिघडली. तसेच कोठडीमध्ये उलट्या करत तो तिथेच कोसळला. पोलिसांनी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारांदरम्यान, तिथेच त्याचा मृत्यू झाला. आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे.