गुजरातमधील अहमदाबाद येथील एका ७५ वर्षीय एनआरआयच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीसोबत कॅनडामध्ये स्थायिक असलेले आणि मुळचे गुजरातमधील करमसद येथील रहिवासी असलेले कन्हैयालाल भवसार यांची राहत्या घरी हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत मसाज करणाऱ्या एका महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे.
कॅनडामध्ये स्थायिक असलेले कन्हैयालाल भवसार हे वर्षातील काही दिवस गुजरातमध्ये येऊन राहायचे. यावर्षीही ते अहमदाबाद येथे आले होते. ही घटना घडली त्या दिवशी ते घरात एकटेच होते. त्यांची पत्नी करमसद येथे गेली होती. कन्हैयालाल यांनाही तिथे जायचं होतं. मात्र १३ जानेवारी रोजी त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांचा पत्नी वर्षाबेन यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
दरम्यान पोलीस जेव्हा अहमदाबादमधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेव्हा त्यांना घरामध्ये कन्हैयालाल हे मृतावस्थेत आढळून आले. पोस्टमार्टेम रिपोर्टमधून कन्नैयालाल यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. याबाबत अधित माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जेव्हा घराचा सीसीटीव्ही तपासला तेव्हा दुपारी ३ वाजल्यानंतर घरामध्ये निलोफर नावाची एक महिला आल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि रात्री उशिरा या वृद्ध एनआरआयच्या घरी आलेली महिला निलोफर आणि तिच्या पतीला अटक केली. हे दोघेही मुंबईमधून पळ काढण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलोफर ही मुंबईतील एक डान्स बारमध्ये काम करायची. डान्स बार बंद झाल्यानंतर ती अहमदाबादला आली. तसेच येथील एक स्पामध्ये काम करू लागली.
कन्हैयालाल हे जेव्हा कॅनडाहून अहमदाबादला यायचे तेव्हा ते निलोफरच्या स्पामध्ये जायचे. तसेच मसाज करवून घ्यायचे. अनेकदा मसाज करवून घेण्यासाठी ते निलोफर हिला घरी बोलावून घ्यायचे. त्यामुळे त्यांच्या घरच्या स्थितीबाबत निलोफर हिला चांगलीच माहिती मिळाली होती. एनआरआय असल्याने आणि श्रीमंत असल्याने निलोफर हिने कन्हैयालाल यांना लुटण्याचा प्लॅन बनवला. मात्र कन्हैयालाल यांना याचा संशय आला होता. त्यामुळे निलोफर हिला तिचा प्लॅन बदलावा लागला होता.
त्यानंतर निलोफर आणि तिच्या पतीने कन्हैयालाल यांना दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर निलोफरच्या रिक्षाचालक पतीने त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. तसेच घरामधून दागदागिने, तीन मोबाईल आणि ३ लाख रुपये घेऊन फरार झाले. पोलिसांनी हे दागिने विकून मिळवलेले पैसे आरोपींकडून जप्त केले आहेत.