मेहसाणा: लग्नाची वरात घोड्यावरुन काढल्यानं ग्रामस्थांनी सर्व दलितांना बहिष्कृत केलं आहे. गुजरातच्या मेहसणामधल्या कडी इथल्या ल्होर गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गावातल्या दलित कुटुंबाशी संबंध ठेवल्यास पाच हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णयदेखील ग्रामस्थांनी सरपंचांच्या मदतीनं घेतला.ल्होर गावातल्या मनुभाई परमार यांचा मुलगा मेहुलचा विवाह नुकताच संपन्न झाला. त्यावेळी घोड्यावरुन वरात काढण्यात आली. नाचत-गात काढण्यात आलेली ही वरात गावातल्या उच्चवर्णीयांना रुचली नाही. त्याच रात्री ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. त्यात दलितांविरोधात अनेक निर्णय घेण्यात आले. गावातल्या दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून गावातल्या दलितांना पाणी, दूध, भाज्या यासारख्या वस्तू देण्यात आल्या नाहीत. गावातल्या एखाद्या व्यक्तीनं दलितांसोबत संबंध ठेवल्यास त्याच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी मनुभाई परमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सरपंचासह 4 जणांना अटक केली. तर सरपंचाचा मुलगा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर दलितांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास सुरुवात झाली.
घोड्यावरुन वरात काढल्यानं गावाचा दलितांवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:19 AM