डांग : गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याचे भीषण संकट आहे. येथील अनेक जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस पडतो, मात्र डोंगराळ व खडकाळ भाग असल्याने पावसाचे पाणी थांबत नाही. डांग जिल्ह्यात दर पावसाळ्यात जवळपास 125 इंच पावसाची नोंद होते, मात्र डोंगराळ आणि खडकाळ भागामुळे पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते.
एवढा पाऊस होऊनही येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठीही त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. येथील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकले आहे.
वासुरणा गावातील 60 वर्षीय शेतकरी गंगाभाई पवार हे 20 वर्षांपासून गावातील सरपंचाकडे विहिरीसाठी मदत मागत होते. मात्र, त्यांच्या सरपंचापासून ते प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही. यानंतर गंगाभाई पवार यांनी स्वतः विहीर खोदण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा विहीर खोदल्यावर दगड निघाले, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्यांदाही पाण्याऐवजी दगड सापडले, पण हार न मानता गंगाभाई पवार यांनी पाचवी विहीर खोदण्यास सुरुवात केली, रात्रंदिवस 2 वर्षाच्या मेहनतीनंतर, अखेर पाचव्या विहिरीत 32 फूट खोलीवर पाणी आले.
दरम्यान, गावाच्या सरपंच गीताबेन गावित यांनी गंगाभाई पवार यांच्या मेहनतीचे कौतुक केले व अभिनंदन केले. गावातील ग्रामस्थ अर्जुन बागुल म्हणाले की, ही विहीर केवळ गंगाभाईचीच नव्हे तर संपूर्ण गावाची तहान भागवेल. आता गंगाभाई यांनी आपल्या मेहनतीने विहीर खोदून पाणी काढले आहे, तर ही विहिरीच्या बांधकामासाठी पैशाची गरज भासणार आहे. त्यामुळे सरकारकडून काही मदत मिळते का, हे पाहावे लागेल.