नवी दिल्ली - गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद् गीतेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत श्रीमद्भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
जितू वघानी यांनी "भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. श्रीमद्भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता 6वी ते 12वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील" अशी माहिती सभागृहात दिली आहे. सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमांमध्ये श्रीमद्भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात श्रीमद्भगवद् गीता समाविष्ट करण्यात येईल, असं देखील म्हटलं आहे.
शाळांमध्ये यासोबतच, प्रार्थना, श्लोक, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील श्रीमद्भगवद् गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी डिसेंबर 2021 मध्ये घोषणा केली होती की हरियाणातील शाळांमध्येही श्रीमद्भगवद् गीतेचे श्लोक शिकवले जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.